श्री देव लक्ष्मीनारायणास समकालीन व बरेचसे साम्य असलेली दुसरी मूर्ती म्हणजे पंढरपूरच्या श्री विठुरायाची! या दोन्ही देवस्थानात एक नाते आहे. त्यामुळे या देवस्थानास “प्रति पंढरपूर” या नावाने ओळखले जाते.
‘श्री देव लक्ष्मीनारायणाच्या उपासकांनी तसेच वालावल ग्रामस्थांनी पंढरपुराची वारी करू नये’ असा एक पूर्वापार चालत आलेला अलिखित दंडक आहे. “विठ्ठल आमुचा आमच्याच गावी.. कशासाठी करू आम्ही पंढरीची वारी” हा त्यामागील भाव आहे. कारण श्री नारायण यांस ‘श्री विठ्ठलस्वरूप’ मानले जाते.
दरवर्षी आषाढी एकादशीला श्री देव लक्ष्मीनारायणाकडील तुलसीमाला पंढरपूरच्या श्री विठ्ठलाकडे पाठवली जाते; आणि कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठ्लाकडील तुलसीमाला श्री देव लक्ष्मीनारायणाकडे परत येते. ही प्रथा श्रींच्या स्थापनेपासून चालत आली आहे, असा संदर्भ आहे.
वालावल गावातून कोणीही पंढरपूरक्षेत्री वारीतून जाऊ नये असा काटेकोर दंडक असला, तरी या गावातून फक्त ‘करमळीकर प्रभू’ यांच्या घराण्यातून एका व्यक्तीला जाण्यास गावाने मुभा दिली होती. दरवर्षी या एकाच घराण्यातील एका व्यक्तीने दरवर्षी न चुकता आषाढी-कार्तिकीला जावे व श्री लक्ष्मीनारायणाच्या गळयातली तुळशीची माळ पंढरपूरच्या विठोबाच्या गळ्यात घालावी, अशी पूर्वापार परंपरा होती. ज्या दिवशी श्री नारायणाकडील तुलसीमाला श्री विठोबाला वाहिली जाते त्या दिवशी विठोबाला नैवेद्य दाखवला जातो; शिवाय ब्राह्मण भोजनही घातले जाते. तुलासीमाला घेऊन आलेल्या प्रभुंचे आदरातिथ्य करून विठोबाचा जुना पोषाख वस्त्रे त्यांनी दिली जातात. ज्यावेळी श्री नारायणाकडून आलेली तुलसीची माळ विठोबाच्या गळ्यात असते त्यावेळेसच विठ्ठलाची मूर्ती ही सोवळ्यात असते व केवळ निवडक लोकांनाच श्री विठ्ठलमूर्तीला स्पर्श करण्याची अनुमती असते. करमळीकर प्रभू पंढरपूरहून आले की त्यांचेघरी पाच ब्राह्मणाकरवी ब्राह्मण भोजन, महाप्रसाद केला जाई.
आपल्या या उत्सवात कोणतीही कमी असू नये यासाठी गावातल्या सर्व मंडळींनी नारायणलाच नतमस्तक व्हावे असा वालावल गावचा रिवाज आहे. पूर्वी दळणवळणाच्या सुविधा मर्यादित होत्या. गावातून वारीला निघायचे म्हणजे महिनाभर गावाकडे पाठच फिरवावी लागे. या काळात गावातल्या उत्सवांचे काय हा प्रश्न निर्माण झाला. मग गाववासीयांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि विठ्ठलला श्री नारायणाचरणी साकडे घातले, असे या परंपरेमागे सांगितले जाते.
तर दुसरीही कथा अशी सांगितली जाते की, गावातून वारीला गेलेली मंडळी पुन्हा आलीच नाहीत. म्हणून गाव नारायणाचरणी एकत्रित जमला आणि यापुढे कोणत्याही प्रकारे वारी काढली जाणार नाही. तीर्थयात्रा म्हणून गावातून निघणार नाही असा निर्धार करण्यात आला. आम्ही आमच्या भक्तीत खंड पडू देणार नाही असे भक्तांनी देवाला वचन दिले. हा रिवाज पिढयान् पिढया सुरू आहे. आजही गाव ही प्रथा जपतो आहे.