गोवा प्रांतावर यवनांचे राज्य :
१४व्या शतकाच्या मध्यापासून मुसलमानांनी गोव्यात प्रलय मांडला होता आणि हिंदूंची दैना होऊन त्यांची देवालये भ्रष्ट होऊ लागली होती. इ.स. १३५१-५२मध्ये बहामनी सुलतान ‘हसन गंगू’ने गोवा प्रांत जिंकला. इ.स. १३५२-१३८०मध्ये बहामनी सत्तेने गोव्यातील जनतेचे सक्तीने धर्मांतर सुरु केले. प्रजेची छळवणूक करून देवालये भ्रष्ट केली. गोवा प्रदेशाचे राजे कदंब ‘सप्तकोटीश्वाराला’ आराध्यदैवत मानीत होते. बहामनी सल्तनतीने कदंबांचा पराभव करून गोवा जिंकले; तेव्हा त्यांनी “गुजरातच्या सोमनाथ मंदिराप्रमाणे गोव्यातील सप्तकोटीश्वराच्या मंदिरातसुद्धा संपत्ती पुरून ठेवली असेल” असा समाज करून घेतला आणि संपत्तीच्या लोभापायी संपूर्ण मंदिर उद्ध्वस्त करून टाकले.
अश्या या धार्मिक छळाच्या काळात श्री देव नारायणाच्या ‘हरमल’ येथील देवालयाला धोका उत्पन्न झाला. त्याची पूजा-अर्चा करणाऱ्या ब्राह्मणांनी ‘श्री देव नारायणा’ची मूर्ती हरमल गावाहून ‘दक्षिण कोकणात कुडाळ प्रांती वालावल’ येथे आणली आणि जंगलात लपवून ठेवली, असे मानले जाते.
यवनांचा बिमोड व देवालयांची पुनर्स्थापना :
इ.स. १३३६ मध्ये ‘महाराजा बुक्क’ व त्यांचा पुत्र ‘हरिहर’ यांनी विजयनगरप्रांतात हिंदू राज्याची स्थापना केली. त्यांचा मुख्य प्रधान ‘माधवाचार्य’ याने इ.स. १३४५ मध्ये कोकण प्रांतावर स्वारी करून मुसलमानांना या प्रांतातून घालवून दिले.
त्यानंतर सुमारे १३८० मध्ये विजयनगर सम्राट ‘बुक्क’ यांच्या कारकिर्दीत माधवाचार्यांनी गोवा प्रदेश जिंकला व हिंदू धर्माची पुन:प्रस्थापना केली. तुर्कांना हुसकवून सप्तकोटीश्वर व गोव्यातील इतर मंदिरांचा पुनरुद्धार केला.
छत्रपती शिवाजी महाराज व मंदिराचा जीर्णोद्धार :
१४व्या शतकाच्या उत्तरार्धात हा प्रदेश निर्यवन झाल्यावर आणि सारे काही स्थिरस्थावर झाल्यावर वालावल गावी श्री नारायणमूर्तीची स्थापना करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण स्वारीच्या वेळेस ‘श्री देव नारायणा’चे दर्शन घेतले असावे, अशी आख्यायिका आहे. १३ नोव्हेंबर १६६८ रोजी महाराजांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिर उभारण्यासाठी कोनशीला बसवली. एवढेच नव्हे तर तेव्हा छत्रपतींनी संपूर्ण वालावल गावचे उत्पन्न देवास व वृत्तीकास लावून दिले होते, असा उल्लेख आढळतो.
सभासदाच्या बखरीत शिवाजी महाराजांच्या कुडाळ मोहिमेचा उल्लेख आहे.
कुडाळ प्रांताचा इतिहास जेवढा उपलब्ध आहे तेवढाही ‘श्री देव लक्ष्मीनारायणा’च्या मूर्तीबद्दल किंवा मंदिर स्थापनेबद्दल उपलब्ध नाही. शिल्पकलेचा विचार करता ‘श्री देव नारायणा’च्या मूर्तीचे शिल्प आठव्या शतकातील चालुक्यकालीन आहे, असे म्हणतात. काही विद्वानांच्या मते मूर्तीचे शिल्प अकराव्या शतकातील चौलकालीन शिल्पाशी जुळणारे आहे.
थोडक्यात मूर्ती एक हजार वर्षापेक्षा प्राचीन निश्चित असावी.
प्रचलित समज असा आहे कि श्री देव नारायणची मूर्ती हरमल गावाहून आणून वालावल येथे ‘कल्याण पुरुष’ या नावाच्या ब्राह्मणाने स्थापना केली आहे.
चंद्रभान प्रभुदेसाई आणि सूर्यभान प्रभुदेसाई :
मूर्तीस्थापनेच्या वेळी या गावी चंद्रभान प्रभुदेसाई आणि सूर्यभान प्रभुदेसाई हे राज्यकर्ते होते. त्यांनी श्रींचे देवालय बांधण्याच्या कामी मदत केली आणि नंतर वालावल गावचे उत्पन्न श्रींना अग्रहार करून दिले. या चंद्रभान आणि सूर्यभानाच्या वंशजांना पुढे काही परचक्रामुळे गाव सोडून जावे लागले. जाण्याअगोदर त्यांनी देवस्थानाची एकंदर व्यवस्था लावली आणि आपल्याकडे असलेले शिक्के-रुक्के देवाच्या गळ्यात घातले, असे मानले जाते.
‘श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल’ हे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट (१९५०) अंतर्गत नोंदणीकृत असे सार्वजनिक विश्वस्त मंडळ आहे.
वालावल ग्रामस्थित श्री देव श्री लक्ष्मीनारायणा च्या भाविकांना सेवासुविधा पुरवणे तसेच देवस्थानाची देखभाल, दुरुस्ती व अन्य गरजांची पूर्तता करणे ही प्रमुख उद्दिष्टे निश्चित करून दि. १३ जून १९९३ सदर ट्रस्ट ची स्थापना श्री शांताराम कृ. वालावलकर रा. कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
सदर संकेतस्थळावरील सर्व मजकूर हा केवळ आणि केवळ ‘विविध संदर्भग्रंथ तसेच जुन्या जाणत्या भक्तगणांकडून मिळालेल्या माहिती’वर आधारित आहे. श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल त्याची सत्यता प्रमाणित करतेच असे नाही.