सुमारे १९८५ नंतरच्या काळात समाजात आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांकृतिक, शैक्षणिक अशी अनेक स्थित्यंतरे घडत गेली. श्री लक्ष्मीनारायणाच्या भक्तांचे राहणीमान, आर्थिक स्तर, जीवनशैली यांत बदल होत गेले. भक्ती आणि श्रद्धेला आधुनिक विचारांची जोड मिळाली.
श्री नारायणाच्या भक्तगणांनी एकत्र यावे, त्यांनी “श्री देव लक्ष्मीनारायणादी स्थानिक सल्लागार उपसमिती, वालावल” यांचेसोबत समांतररित्या कार्य करावे आणि देवस्थानामध्ये देखभाल-दुरूस्ती आणि सुधारणात्मक उपक्रम राबवावे, असा विचार जोर धरू लागला.
सन १९८५ नंतर श्री. एस्. एन्. देसाई (माजी मंत्री, महाराष्ट्र शासन) यांनी श्री नारायणावरील श्रद्धेने प्रेरित होऊन श्री मोतीरामशेट देसाई टोपीवाले, श्री सीतारामशेट देसाई टोपीवाले, श्री शांताराम कृष्णाजी (बापूसाहेब) पंतवालावलकर, श्री गोविंद अच्युत देसाई, श्री प्रतापराव नारायनराव वालावलकर (सर्कसवाले), श्री द्वारकानाथ विठ्ठल देसाई, श्री रामभाऊ महादेव वालावलकर, श्री केशव गंगाराम भागवत सर, श्री प्रभाकर देसाई (हॉटेल सिंधुदुर्ग) अश्या असंख्य समविचारी भक्तांना एकत्र आणले.
वरील सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिणामस्वरूप सन १९८७ मध्ये श्री लक्ष्मीनारायण भक्तवृंद प्रतिष्ठान, मुंबई या ट्रस्टची स्थापना करण्यात आली. ‘आपल्या पूर्वजांनी स्थापन केलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिराचा मूळ ढाचा तसाच ठेवून, त्यास आधुनिक रूप देऊन मजबूत आणि सुशोभित करणे तसेच मंदिराची नित्य पूजाअर्चा, सणवार, देखभाल व दुरूस्ती हा या ट्रस्टच्या स्थापनेमागील एकमेव उद्देश होता.
भक्तवृंद प्रतिष्ठानच्या सभासदांनी स्वखर्चाने तसेच अन्य भक्तगणांनी केलेल्या आर्थिक मदतीच्या साहाय्याने इ.स. १९९०-९२ मध्ये श्रींच्या देवालयात बरेच नूतनीकरण व सुशोभीकरण काम केले.
सदर कामास पूर्ण होण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागला.
कै.श्री शांताराम कृष्णाजी (बापूसाहेब) पंत वालावलकर यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी स्वत:च्या कापड व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत तर केलीच; सोबत इतर भक्तगणांचे सहकार्य घेऊन ‘श्री लक्ष्मीनारायण भक्तवृंद प्रतिष्ठान’ची राहिलेली कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली.
काही तांत्रिक कारणांमुळे श्री लक्ष्मीनारायण भक्तवृंद प्रतिष्ठान, मुंबई या ट्रस्टच्या कार्यास मर्यादा येत होत्या. हे लक्षात घेऊन श्री शांताराम कृष्णाजी (बापूसाहेब) पंतवालावलकर यांनी स्वत: पुढाकार घेतला आणि १३ जून १९९३ रोजी “श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल” या संस्थेची स्थापना केली. याकरिता स्वत:कडील रोख रु. १००१/- (रु. एक हजार एक मात्र) विश्वस्तनिधीची जंगम मालमत्ता म्हणून विश्वस्तांकडे स्वाधीन केली. या ट्रस्टमध्ये श्री एस्. एन्. देसाई, (माजी मंत्री, महाराष्ट्र शासन), श्री रामभाऊ वालावलकर, श्री वामनराव वालावलकर अशी अनुभवी आणि जनमानसात आदरणीय स्थान असलेल्या व्यक्तींची निवड केली. त्यांनी या ट्रस्टच्या माध्यमातून नवीन कामे करण्यास सुरुवात केली.
श्री रामभाऊ वालावलकर अध्यक्षस्थानी आल्यानंतर त्यांनी श्री बापूसाहेब वालावलकरांची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली.
मंदिराचे प्रवेशद्वार
पूर्वी मंदिरात प्रवेश करण्यासाठी जो एक दिंडी दरवाजा होता, त्याचा आकार छोटा असल्याकारणाने थोडी गैरसोय होत होती. या दरवाज्याच्या आजूबाजूला रहिवाश्यांची घरे आणि दुकाने असल्याकारणाने दिंडी दरवाजाचा विस्तार करणे हे “श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल” साठी मोठे आव्हान होते.
श्री प्रभाकर रामचंद्र देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक नियोजनबद्ध कार्यक्रम बनवून आवश्यक ते पाठबळ मिळवण्यात आले. संबंधितांना देवळाच्या प्रवेशद्वाराचा विस्तार करण्यामागचा तर्कशुद्ध आणि व्यावहारिक विचार पटवून देण्यात आला आणि संपूर्ण परिसर मोकळा करून घेण्यात आला. या सर्व प्रयत्नांमध्ये कोठेही कटुता निर्माण झाली नाही, हे विशेष! आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना स्थानिकांची गैरसोय होणार नाही याची ट्रस्टने पुरेपूर काळजी घेतली. जी काही थोडीफार उणीव राहिली असेल, तीदेखील श्री नारायणकृपेने लवकरच दूर होईल, याची खात्री आहे.
काही अपरिहार्य कारणाने प्रवेशद्वाराचे रखडलेले काम, “श्री देव लक्ष्मीनारायणादी स्थानिक सल्लागार उपसमिती, वालावल” चे अध्यक्ष अॅडव्होकेट संग्राम देसाई यांच्या कारकिर्दीत पूर्ण करण्यात आले.
भक्तनिवास आणि अन्य उपक्रम
श्री प्रभाकरपंत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टने मंदिर परिसर विस्तृत करण्याचा धडाकाच लावला. आज जे प्रशस्त आवार दिसते आहे ते याच प्रयत्नांची परिणीती आहे, असे समजण्यास हरकत नाही.
या दरम्यान श्री बाळासाहेब पंतवालावलकर, प्रा. जगदीश सा. वालावलकर (विद्यमान अध्यक्ष), श्री उदय रा. वालावलकर आदि नामांकित मंडळी ट्रस्टमध्ये दाखल झाली.
कै. श्री रामभाऊ वालावलकर यांसारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी भक्ताच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टने अजून काही नवीन उपक्रम सुरु केले.
आज या दोन्ही भक्तनिवासाची व्यवस्था पाहण्यासाठी एका व्यवस्थापकाची नेमणूक केलेली आहे. श्री लक्ष्मीनारायणाचे असंख्य भक्तगण आज या सुविधेचा लाभ घेत आहेत.
श्री देव लक्ष्मीनारायणादी स्थानिक सल्लागार उपसमिती, वालावल
सन २००८ नंतर “श्री देव लक्ष्मीनारायणादी स्थानिक सल्लागार उपसमिती, वालावल” तसेच अन्य भक्तगणांनीही देवस्थानच्या आवारात कामे केली आहेत. मंदिराची दैनंदिन व्यवस्था, तसेच उत्सव, जत्रा यांचे आयोजन स्थानिक सल्लागार उपसमिती उत्तमपणे पार पाडते आहे.
विशेष सूचना : सदर माहिती ही “श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल” च्या स्थापनेपासून आजवरच्या वाटचालीचा संक्षिप्त गोषवारा आहे. यामध्ये अनवधानाने काही नामोल्लेख राहून गेल्यास “श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल” दिलगिरी व्यक्त करीत आहे.
‘श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल’ हे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट (१९५०) अंतर्गत नोंदणीकृत असे सार्वजनिक विश्वस्त मंडळ आहे.
वालावल ग्रामस्थित श्री देव श्री लक्ष्मीनारायणा च्या भाविकांना सेवासुविधा पुरवणे तसेच देवस्थानाची देखभाल, दुरुस्ती व अन्य गरजांची पूर्तता करणे ही प्रमुख उद्दिष्टे निश्चित करून दि. १३ जून १९९३ सदर ट्रस्ट ची स्थापना श्री शांताराम कृ. वालावलकर रा. कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
सदर संकेतस्थळावरील सर्व मजकूर हा केवळ आणि केवळ ‘विविध संदर्भग्रंथ तसेच जुन्या जाणत्या भक्तगणांकडून मिळालेल्या माहिती’वर आधारित आहे. श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल त्याची सत्यता प्रमाणित करतेच असे नाही.