आख्यायिका (किंवा दंतकथा) म्हणजे “लोक जीवनात मौखिक परंपरेने चालत आलेली कथा” होय. या काही पारंपारिक गोष्टी असतात ज्यांच्याविषयी निश्चित संदर्भ उपलब्ध नसतो. त्यांची सत्यता प्रमाणित करण्यासाठी कोणतेही लिखित पुरावे उपलब्ध नसतात. असे असले तरी त्यांची लोकप्रियता कमी होत नाही. वर्षानुवर्षे या कथा एका पिढीकडून पुढच्या पिढीला सांगितल्या जातात व तेवढ्याच आवडीने ऐकल्या जातात. ज्या प्रसिद्ध व्यक्तींना, स्थळांना आणि घटनांना शेकडो वर्षांचा इतिहास असतो, पौराणिक संदर्भ असतो; त्यांच्याविषयी अश्या आख्यायिका आढळून येतातच.
श्री देव लक्ष्मीनारायण आणि त्यांचे वालावल येथील मंदिर यांस असेच पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ असल्यामुळे त्यांबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. यापैकी प्रातिनिधिक स्वरूपातील काही आख्यायिका येथे मांडत आहोत.
प्राचीन काळापासून श्री क्षेत्र द्वारावतीला (येथे कर्नाटकातील ‘हळळेबीड’ या ठिकाणाचा संदर्भ आहे.) भगवान श्री विष्णूंच्या केशव, नारायण आदि निरनिराळ्या स्वरूपातील २४ मूर्ती होत्या. साधारणपणे १४व्या शतकात, २४ मुर्तींपैकी ‘अनिरुद्ध’ या एका विष्णुरूपाची मूर्ती तेथून नाहीशी झाली. तेथे फक्त २३ मूर्ती शिल्लक राहिल्या. ही मूर्ती ‘कल्याण पुरुष’ नावाच्या कोण्याएका व्यापाऱ्याच्या हाती लागली. त्याने ति मूर्ती आपल्या नौकेतून गोवा समुदकिनाऱ्याला लागली. तेथून जातेवेळी मात्र नौका जागेवरून हलेना. कारणाचा शोध घेतला असता नौकेमध्ये अनिरुद्धाची मूर्ती सापडली. मूर्ती नौकेबाहेर येताच नौका पूर्ववत चालू लागली. या मागे ईश्वरी संकेत आहे हे लक्षात घेऊन किनाऱ्यानजीकच्या हरमल गावी मूर्तीची स्थापना करण्यात आली.
नंतर जेव्हा गोवाप्रातांत यवनांकडून हिंदूची देव्हारे फोडणे, मूर्ती भ्रष्ट करणे असे सत्र चालू झाले. तेव्हा याच कल्याण पुरुषाने ती मूर्ती तेथून पळवली आणि दक्षिण कोकणात वालावल गावी ‘तुवांच्या राईत’ लपवून ठेवली. पुढे यवनांचा बिमोड झाल्यावर ‘वालावल’ गावी श्रींची स्थापना करण्यात आली. सर्व व्यवस्था झाल्यावर कल्याण पुरुषाने श्रींच्या पादुका माथी घेऊन समाधी घेतली.
तीच ही अनिरुद्धाची वालावल येथील मूर्ती!
काही वास्तवातील गोष्टी या दंतकथेस आधारभूत आढळून येतात. या कथेत उल्लेखिलेली तुवांची राई म्हणून कुपीच्या डोंगरात एक गर्द झाडीची जागा आहे. दंतकथेप्रमाणे कल्याणपुरुषाची घुमटी श्रींच्या दारी आहे. या घुमटीच्या वरच्या भागात श्रींच्या पादुका कोरल्या आहेत.
विशेष सूचना : उपरोक्त मांडलेले “आख्यायिका आणि चालीरीती” हे विषय व्यक्तीसापेक्ष आहेत. याबद्दल अनेक मते आणि मतांतरे असू शकतात. या ठिकाणी या विषयांमागे ‘परंपरेनुसार मानल्या जाणाऱ्या चालीरीती, पद्धतींची केवळ माहिती देणे’ हाच निव्वळ उद्देश आहे.
‘श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल’ हे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट (१९५०) अंतर्गत नोंदणीकृत असे सार्वजनिक विश्वस्त मंडळ आहे.
वालावल ग्रामस्थित श्री देव श्री लक्ष्मीनारायणा च्या भाविकांना सेवासुविधा पुरवणे तसेच देवस्थानाची देखभाल, दुरुस्ती व अन्य गरजांची पूर्तता करणे ही प्रमुख उद्दिष्टे निश्चित करून दि. १३ जून १९९३ सदर ट्रस्ट ची स्थापना श्री शांताराम कृ. वालावलकर रा. कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
सदर संकेतस्थळावरील सर्व मजकूर हा केवळ आणि केवळ ‘विविध संदर्भग्रंथ तसेच जुन्या जाणत्या भक्तगणांकडून मिळालेल्या माहिती’वर आधारित आहे. श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल त्याची सत्यता प्रमाणित करतेच असे नाही.