आपल्या देवाची आपल्यावर कृपा व्हावी, त्याने आपली मनोकामना पूर्ण करावी म्हणून भाविकगण आपल्या आराध्याकडे साकडे घालतात, नवस करतात. भक्तांनी अंत:करणापासून केलेल्या प्रार्थनेला श्री देव नारायण नेहमीच साद देतात आणि भक्तांचे मनोरथ पूर्ण करतात, असा अनुभव आहे.
हे जागृत देवस्थान असल्यामुळे देवाची ‘कृपा’ आणि ‘नाराजी’ या दोन्हींचा प्रत्यय देणारे बरेच दाखले मिळतात.
भक्त श्री नारायणाला वेगवेगळे नवस करतात. कोणी वड्यांचा नैवेद्य दाखवण्याचा नवस करतात, कोणी लघुरुद्र-महारुद्र करण्याचा नवस करतात. क्वचित गंधाची पूजा करण्याचा नवस बोलला जातो.
काही भक्तजन तुलाभाराचा नवस करतात. (उदाहरणार्थ एखाद्या भक्ताने आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी नवस केला असेल आणि ईश्वरकृपेने त्याचा आजार बरा झाला तर त्या मुलाच्या वजनाची तुलना करून तेवढ्याच वजनाच्या वस्तूंचे दान करणे.) हा तुलाभार साखर, गुळ किंवा नारळ यांचा करतात.
देवाच्या दारी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा नवस केला जातो. गावातील काही घराण्यांमध्ये तर सत्यनारायणाची पूजा करायची झाल्यास ती श्री नारायणाच्या देवळात करण्याची परंपरा आहे.
गावातील मुलाचे अथवा मुलीचे लग्न ठरले तर पहिले आमंत्रण श्री नारायणाला दिले जातेच, त्याचबरोबर ते लग्न झाले कि देवाला देवाजोडा, शाल किंवा सोवळे अर्पण करतात.
विशेष सूचना : उपरोक्त मांडलेले “आख्यायिका आणि चालीरीती” हे विषय व्यक्तीसापेक्ष आहेत. याबद्दल अनेक मते आणि मतांतरे असू शकतात. या ठिकाणी या विषयांमागे ‘परंपरेनुसार मानल्या जाणाऱ्या चालीरीती, पद्धतींची केवळ माहिती देणे’ हाच निव्वळ उद्देश आहे.
‘श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल’ हे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट (१९५०) अंतर्गत नोंदणीकृत असे सार्वजनिक विश्वस्त मंडळ आहे.
वालावल ग्रामस्थित श्री देव श्री लक्ष्मीनारायणा च्या भाविकांना सेवासुविधा पुरवणे तसेच देवस्थानाची देखभाल, दुरुस्ती व अन्य गरजांची पूर्तता करणे ही प्रमुख उद्दिष्टे निश्चित करून दि. १३ जून १९९३ सदर ट्रस्ट ची स्थापना श्री शांताराम कृ. वालावलकर रा. कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
सदर संकेतस्थळावरील सर्व मजकूर हा केवळ आणि केवळ ‘विविध संदर्भग्रंथ तसेच जुन्या जाणत्या भक्तगणांकडून मिळालेल्या माहिती’वर आधारित आहे. श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल त्याची सत्यता प्रमाणित करतेच असे नाही.